Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – छत्रपती शिवाजी राजे हे शहाजी भोसले आणि जिजाऊ यांचे चिरंजीव. शहाजीने निजामशाहाची सरदारकी स्वीकारली होती. दौलताबाद हि निजामशाहाची राजधानी होती. शहाजी जिजाऊला घेऊन त्या शहरी गेले. वास्तविक जिजाऊ पतीच्या सहवासात विशेष वैभवात आनंदात राहू शकली असती. परंतु सभोवती चालत असलेले अत्याचार, सत्तेसाठी चाललेला मोगल, निजामशहा आणि अन्य सुलतान यातील संघर्ष आणि त्यात नाहक बळी जाणारे बहुसंख्य मराठे बघून जिजाऊ अत्यंत व्यथित होत असे.
निजामशहाच्या दरबारात शहाजींचे वजन वाढल्याने तेथील वजीर मलिक अंबरला शहाजीराजांबाबत द्वेष वाटू लागला. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहाजीराजांनी निजामशाही सोडली व ते आदिलशहा कडे गेले. येथे त्यांचे सन्मान पूर्वक स्वागत झाले व त्यांनी सरलष्कर हा किताब मिळाला. याच दरम्यान जिजाऊ गरोदर राहिली आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना पुण्यापासून सव्वीस कोसावर असलेल्या शिवनेरी गडावर पोहोचवले. त्या गडाचे किल्लेदार विजयराव व विश्वासराव हे त्यांच्या नात्यातले व विश्वासातले होते. जिजाबाईच्या आगमनाने गडावर आनंदी आनंद झाला. याच गडावर जन्मलेल्या या पुत्राचे नाव ठेवण्यात आले. शिवाजी. त्यांचा जन्म दिनांक होता १९ फेब्रुवारी १६३०.
Table of Contents
शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण – shivaji maharaj childhood
Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – शहाजीराजांना पुत्र झाल्याची सुवार्ता कळविण्यात आली. शहाजीराजांची राजकारणाची गडबड सुरु होतीच. त्यातूनच थोडी सवड काढून ते शिवनेरी वर आले. पुत्राचे तेजस्वी रूप पाहून ते आनंदित झाले. मात्र पुत्राच्या सहवासात राहणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना लगेचच मोहिमेवर निघून जावे लागले.बाळराजांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वस्वी जिजाईवर पडली. रामायण, महाभारत यांच्या छोट्या कथा, पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी, देवगिरीच्या यादवांचा इतिहास आदी सांगून त्यांनी बालमनावर संस्कार केले.
शहाजीराजे विजापूर दरबाराचे राजे झाले. शिवबा आणि जिजाई शिवनेरी सोडून विजापूरला जाण्यास निघाले. विजापुरातील सुखसमृद्धी, शाही उद्याने गजबजलेले रस्ते, आलिशान हवेल्या, शृंगारलेले हत्ती आणि आपल्या मुलखातील दैन्य, दारिद्र्य, दुर्दशा आठवून शिवबा दु:खी झाले. एकदा शहाजीराजांबरोबर शिवबा दरबारात गेले. मुसलमान बादशहाला वाकून प्रणाम करणे शिवबाला रुचले नाही. त्यांनी त्या बाबत नाराजी व्यक्त केल्यावर शहाजीराजे चपापले आणि शिवबांना म्हणाले कि, हिंदूंनी यवनांची सेवा करीत राहावी. हे आम्हाला पटत नाही. तुम्ही मोठे पाणी यातून मार्ग काढा. त्यानंतर शिवबा पुन्हा केव्हाही दरबारात गेला नाही.
शिवबा हळू हळू मोठा होता होता. तो शहाजी राजांना म्हणाला कि, यवनांचे अत्याचार पाहून आमचे मन भडकून उठते. आमच्या हातून काही अधिक-उणे घडायची शक्यता आहे. शहाजीराजे चपापले. शिवबाची व्यथा शहाजीराजांनी ओळखली आणि त्यांनी जिजाऊ व शिवबांना पुण्याला पाठवायचा निर्णय घेतला.
पुण्याला आल्यावर दादोजी कोंडदेवांनी शिवबाच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली. दादोजीपंत शहाजीराजांचे विश्वासू सेवक होते. त्यांनी शिवबासाठी खास शास्त्री पंडितांची नेमणूक केली. तसेच लाठी, तलवार, भाले, कट्यार, जंबिया यांचे शिक्षण शिवबाला देण्यात आले. कसरतीने शरीराला बांधेसूद आकार आला. चेहरा राजबिंडा दिसू लागला. पुण्यातील वर्तमान व शिवबाची प्रगती वेळोवेळी शहाजीराजांना कळविण्यात येत असे.
शिवाजी महाराजांचा विवाह आणि स्वराज्याचा संकल्प – shivaji maharaj marriage
योग्य वेळी फलटणच्या निंबाळकरांची मुलगी सईबाई हिच्या बरोबर शिवबाचा थाटामाटात विवाह करण्यात आला. मंडळी पुण्याच्या लाल महालात येऊन दाखल झाली. शिवाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब पुण्याला राहायला आल्यामुळे यवनांच्या भीतीने पळून गेलेले शेतकरी परत आले. ओसाड शेते पिकू लागली. पडक्या मंदिराचे जीर्णोद्धार होऊ लागले.
शिवाजी राजे घोड्यावर रपेटी करू लागले. दांडपट्टा, तलवार चालवू लागले. जहागिरीतील कारभाराशी त्यांचा परिचय होऊ लागला. मावळ्यांशी त्यांनी मित्रत्वाचे संबंध जोडले. त्यांच्या तेथे राहण्याने प्रजा निर्भय झाली.
मावळ खोऱ्यातील देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी आदी वतनदारांशी शिवाजीराजांची ओळख झाली. शुल्लक गोष्टीसाठी एकमेकांच्या जीवावर उठण्यापेक्षा तुमच्या मुली बाळांची अब्रू लुटणाऱ्या, धर्मावर घाला घालणाऱ्या सत्तेविरुद्ध लढा असे त्यांनी त्यांना सांगितले. हळू हळू शिवाजी राजांच्या भोवती तरुण, कणखर आणि निष्ठावान मित्र जमू लागले.
शिवाजी महाराजांच्या मित्रांची नावे :-
१] तान्हाजी मालुसरे
२] सूर्याजी पिसाळ
३] येसाजी कंक
४] त्र्यंबक सोनदेव
५] नारोबा देशपांडे
६] बाजीप्रभू
७] चिमाजी
८] बाळाजी
असे कितीतरी समर्पित वृत्तीचे मर्द होते. शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मनात परकीय सत्तेविषयी चीड आणि हृदयात स्वातंत्र्याची दुर्दम्य आकांशा निर्माण केली.
आपल्या माँसाहेबांची आज्ञा आणि दादोजीपंताचे आशीर्वाद घेऊन मावळे मंडळींसह शिवाजीराजे रोहिडेश्वराच्या गाभाऱ्यात शिरले आणि श्री रोहिडेश्वराच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराजाचा संकल्प सोडला. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात आम्ही प्राण पणाला लावून तुम्हाला साथ देऊ असे एकास्वाराने मावळ्यांनी शिवाजीराजांना आश्वासन दिले. हा दिवस होता १९ फेब्रुवारी १६४५
शाहिस्तेखानाची फजिती

Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – शिवाजी महाराज दिल्लीच्या इस्लामी सिंहासनाचे खरेखुरे शत्रू आहेत. याबद्दल औरंगजेबाची खात्री पटली आणि त्यांनी आपले मामा शाहिस्तेखान यांना प्रचंड फौजेनिशी दक्षिणेकडे शिवाजी राजांवर स्वारी करण्यास पाठवले. खानाने आपल्या प्रचंड फौजेचे दोन हिस्से केले. एक घाटाखाली चौलजवळ ठेवला आणि दुसरा घाटावर रहिमतपूर येथे ठेवला. त्यामुळे स्वराज्याची कोंडी झाली. अधूनमधून चकमकी होत होत्या परंतु खान कोणतीच निर्णायक हालचाल करायला तयार नव्हता. खान दिर्घकाळ असाच राहिल्यास स्वराज्यातील लोकांचे मनोबल ढासळले असते.
शाहिस्तेखानाचा कडेकोट बंदोबस्तात पुण्याच्या लालमहाल येथे मुक्काम होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर सक्त नजर ठेवली जात होती. लग्नाचे वऱ्हाड मिरवत आणण्यासाठी खानाच्या अधिकार्याकडे परवानगी मागण्यात आली. परवानगी मिळाल्यावर वऱ्हाड लाल महालाला वळसा घालून मिरवणुकीने निघाले. वाड्यातल्या एका अंधाऱ्या खोलीत नवनवधूने प्रवेश करून स्त्रीवेश फेकुन दिला व हातात समशेर घेतली.
राजांना लालमहालाची बारीकसारीक माहिती होती. अंधारातून वाट काढीत व मध्ये येणाऱ्यांना कापून काढीत त्यांनी वाड्याचा ताबा मिळविला व खानावर वार केला. खानाची बोटे घाटली गेली. खान थरथर कापत होता. राजे खानाला म्हणाले, शिवाजी महाराज म्हणतात तो मीच ! आज तुझ्यावर दया करतो. जीव प्यारा असेल तर पुणे सोडून जा. अंधारात राजे दिसेनासे झाले आणि त्यांनी सिंहगडाकडे कूच केली.
शाहिस्तेखानाने पुणे सोडले आणि औरंगाबादेकडे मुक्काम हलवला मामाच्या दुर्दशेमुळे औरंगजेब संतापून गेला. सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे ठिकाण होते. राजांनी सुरतेवरही विजय मिळावला व अमाप संपत्ती जमा केली. हिरेमोती, जडजवाहीर, सोनेचांदी आदि प्रचंड लूट घोड्यांवर घालून राजे परतले.
आग्रा येथे औरंगजेबाची भेट
Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – शिवाजीराजांनी आरमाराकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली. सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग यांची उभारणी केली. सागरावरही राजांना विजय मिळत गेला. राजांच्या आरमाराने सिद्दी आणि टोपीकर अस्वस्था झाले.
औरंगजेबाला राजांवर स्वारी करण्याची कधीही हिंमत झाली नाही. परंतु या कामासाठी त्याने मिर्झा राजे जयसिंह यांना प्रमुख नेमले. शिवाजीराजांच्या सर्व शत्रुंना त्यांनी पाचारण केले. प्रथमतः पुरंदर किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. पुरंदर किल्लेदार मुरारबाजी होते. ते मोगलांशी शर्तीने लढले. पुरंदरावर राज्यांचे मोठमोठे सरदार कुटुंबासह राहत होते. जयसिंगाने चारी बाजूंनी वेढा दिला. तह करण्याखेरीज अन्य मार्ग उरला नाही. राजांचा नाईलाज झाला तहा प्रमाणे राजांना पुरंदर, सिंहगड आदि तेवीस मजबूत किल्ले मोगलांना द्यावे लागले. राजांकडे केवळ बारा किल्ले उरले.
राजांनी सैनिकांना परत पाठवण्याची परवानगी मागितली. औरंगजेब खूशच झाला. त्याने आनंदाने परवानगी दिली. त्यामुळे आनायासेच राजे एकटे पडणार होते. राजे बादशहा दरबारातील मंडळींशी सलोख्याने वागू लागले. गरीब फकिरांना दानधर्म करू लागले. प्रथमतः पहारेकरी पेटाऱ्यांची तपासणी करीत, नंतर ते त्याकडे फारसे लक्ष्य देईनासे झाले.
राजांनी परत आपले लक्ष्य स्वराज्याकडे वळवले. मोघल आणि मराठे यांचा तात्पुरता समेट झाला. मोघलांनी राजांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. शांतता आणि सुबत्ता यांनी स्वराज्य सुसज्य झाले.
गड आला पण सिंह गेला
Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – औरंगजेबाला हे सर्व पाहवेना. त्याने राजांचा आणि हिंदूंचा सूड घेण्यासाठी हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्याचा, हिंदूंना बाटविण्याचा सपाटा लावला. राजे संतापले आणि राजांनी परत गेलेले किल्ले मिळवण्यासाठी चढाई सुरू केली.
कोंढाणा सर करण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवण्यात आली. या किल्ल्यावर मोगलांचा कडक बंदोबस्त होता. तरीदेखील न डगमगता तानाजी मालुसरे गडावर चालून गेले. पराक्रमाची शर्थ केली आणि कोंढाणा काबीज केला. मात्र तानाजीला वीरगती प्राप्त झाली. स्वतःच्या मुलाचे, रायबाचे लग्न बाजूला ठेवून तानाजी कोंढाणा सर करायला निघाला होता.
राजांना तानाजीच्या मृत्यूचे अतोनात दुःख झाले. गड आला पण सिंहासारखा तानाजी गेला असे दुःखोद्गार त्यांच्या तोंडातून निघाले. त्या वेळेपासून कोंढाण्याला सिंहगड म्हणू लागले. राजांनी तानाजीच्या कुटुंबियांची उत्तम सोय करून दिली आणि माँसाहेबांनी रायबाचे लग्न थाटात लावून दिले.
याच सुमारास सोयराबाई राणीसाहेबांना पुत्र झाला. त्यांचे नाव राजाराम ठेवण्यात आले. सिंहगडाच्या विजयानंतर पुरंदर, कल्याण, लोहगड, हिंदोळा, माहुली, अर्नाळा राजांच्या ताब्यात आले. त्यानंतर सुरत, वणी, दिंडोरी, बागलाण, कोकण, पन्हाळगड, परळी, विजापूरकरांचे किल्ले अशी कित्येक ठिकाणे राजांनी काबीज केली आणि कोट्यावधी होनांची लूट जमा केली.
शिवाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा – shivaji maharaj coronation ceremony
Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – स्वराज्याचा भगवा ध्वज सर्वत्र फडकू लागला. राजांची कीर्ती सर्वत्र पसरली. बुंदेलखंडाचा छत्रसाल राजा राजांना भेटायला आला. अनेक वीर राजांचे दर्शन घेण्यास येऊ लागले. कवी भूषण आणि परमानंद यांनी राजांच्या तेजस्वी चारित्र्यावर अनेक काव्ये केली.
अभेद्य असा रायगड हे राजधानीचे ठिकाण करण्याचे निश्चित झाले. त्यादृष्टीने रायगडावर भव्य प्रासाद, महाल, इमारती, गजशाळा, अश्वशाळा, रथशाळा, बाजारपेठ, राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली.
तोफा आणि दारूगोळ्यांची भांडारे भरली, शस्त्रागार सुसज्ज झाले, धान्याची कोठारे भरभरून गेली.
रायगडाची हवा माँसाहेबांना मानवत नव्हती. त्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे माँसाहेबांसाठी उत्तम राजवाडा बांधण्यात आला. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते आणि एकेदिवशी माँसाहेबांना स्वप्न पडले आणि त्यात त्यांना राजांच्या मस्तकावर छत्रचामरे दिसली. अशातच समर्थरामदास स्वामींचा ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा घोष कानावर आला. माँसाहेबांनी राजांच्या राज्याभिषेकाबाबत समर्थांशी बोलणी केली. अनेक वर्षांनी निर्माण होणाऱ्या हिंदूंच्या स्वतंत्र राज्याला समर्थांनी आनंदाने आशीर्वाद दिले.
काशीच्या गागाभट्टांकडून शिवाजीराजांना राजसिंहासनावर आरूढ करून राज्याभिषेक करून घेण्याचे ठरले. सह्याद्रीच्या कणाकणातून चैतन्य फुलले. राज्याभिषेकांसाठी बत्तीस मण वजनाचे सोन्याचे सिंहासन तयार केले. मोत्याच्या झालरी, जडवाचे छत्र आणि रत्नजडित खांब सिंहासनाला लावले होते.
गागाभट्टांनी आणि अन्य उपपुरोहित वर्गाने पवित्र नद्यांचे जल सुवर्णपात्रातून अभिषेकासाठी आणले. सनई चौघडा वाजू लागला. वेदमंत्रांच्या जयघोषात क्षत्रिय कुलावंतास छत्रपती श्री शिवाजीमहाराज राजसिंहासनावर स्थानापन्न झाले. अष्टप्रधानांनी राजांना सुवर्णस्नान घातले, राजांच्या मस्तकावर सुवर्णछत्र धरले. राज्याभिषेकाच्या सुमुहूर्तावर एकाच वेळी शेकडो किल्ल्यांवरून तोफांची सलामी देण्यात आली. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. हा दिवस होता ६ जून १६७४.
राज्याभिषेकानंतर महाराजांची राजेशाही मिरवणूक निघाली. महाराजांवर सोन्या रुप्याची फुले, माणिक मोती उधळण्यात आले. माँसाहेबांनी महाराजांची दृष्ट काढली. त्यांचा कंठ दाटून आला. त्या म्हणाल्या, शेकडो वर्षांनी हिंदूंचे राजसिंहासन तयार झाले. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. जीवित कृतार्थ झाल्याने माँसाहेबांना समाधान वाटले.
एका देदीप्यमान जीवनाची अखेर
Chhatrapati Shivaji Maharaj Jivan Charitra – महाराजांना संपूर्ण आयुष्यभर मानसिक आणि शारीरिक यातना सोसाव्या लागल्या होत्या. पितापुत्रांनी दिलखुलास बोलणी केली. शंभूराजांचा पुनर्जन्म झाला असे राजांना वाटले. त्यांच्या व्यथित मनाला टवटवी आली. महाराज शंभूराजांना म्हणाले की, रायगडावर जाऊन राजारामाचा विवाह उरकून येऊ व नंतर तुमच्या मनाप्रमाणे दौलतीची व्यवस्था करू. आमच्या पश्चात तुम्हीच राजारामांना सांभाळणार आहात. संभाजीराजांचा भरल्या कंठाने निरोप घेऊन महाराज राजारामाच्या विवाहासाठी निघाले. थाटामाटात मंगल सुमुहूर्तावर राजारामाचा विवाह झाला.
मात्र काही दिवसांनी महाराजांना ज्वर येऊ लागला. राजवैद्यांनी उपचार सुरू केले. परंतु ज्वर वाढू लागला. महाराजांच्या प्रकृतीत उतार पडावा म्हणून वैद्यांच्या उपचाराबरोबर दानधर्म, जपजाप्य, उपासतापास, व्रतवैकल्ये महामृत्युंजय जप आदि दैवी उपाय सुरू झाले. वैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाराजांना पैलतीर दिसू लागले परंतु ते योग्याप्रमाणे शांत होते. मात्र त्यांना संभाजीराजांची भेट घ्यायची होती परंतु राजारामाची आई सोयराबाई ती भेट घडवून देत नव्हती. अखेर महाराजांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना जवळ बोलवले आणि सांगितले की आम्हाला चिंता वाटते स्वराज्याची. कितीही वादळे उठली तरी एकीने आणि विचाराने स्वराज्याचे रक्षण करा.
असा हा थोर राजा भारतवर्षात होऊन गेला. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, जयवंत, असा जाणता राजा भारताचा भाग्यविधाता होता.





